भाजप सरकारने केलेली कर्जमाफी फसवी - घुले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून, त्यातील खोटारडेपणा सिध्द करण्यासाठी राज्यभर वणवा पसरावा लागेल, त्याकरिता शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी येथे केले. 


माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अमृतमहोत्सावानिमत्त दि. २९ जुलै रोजी भेंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून, याच वेळी जिल्ह्यच्या वतीने ना. शरद पवार यांना पद्मभूषण मिळाल्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. त्यानिमित्त शेवगाव येथील अजिंक्य लॉन्स येथे आज आयोजित तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीत अध्यक्षस्थानावरून माजी आमदार घुले बोलत होते. 

या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे संचालक संजय फडके, राजेंद्र दौंड, अंबादास कळमकर, बबन भुसारी, मन्सूर फारोकी, संपत नेमाणे, कृष्णा ढोरकुले आदी उपस्थित होते. 

या वेळी घुले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे सरकार कर्जमाफी द्यायला तयार झाले आहे. परंतु त्यासाठी त्यांनी चाळण लावली असून, ती काढावी लागेल. सरसकट कर्जमाफी व्हावी, ही आमची भूमिका आहे. 

जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे २५८ कोटी रुपये कर्जाचे पुनर्गठण करण्यात आल्यामुळे हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत. तालुक्यात लोकांना चुकीच्या दिशेने मार्गदर्शन करण्यात येत आहे. ताजनापूरसाठी एका दमडीचीही तरदूत झालेली नाही. त्यांना तालुक्याचे काही घेणेदणे राहिलेले नाही. ते विकासाचे बोलत नाहीत व त्यादृष्टीने प्रयत्नही करत नाहीत. आपणही तुम्ही मोठे की, मी मोठा हे सोडून द्या व तालुक्याचा स्वाभिमना जिवंत ठेवा, असे आवाहन केले. 

अडचणीत असताना लोकांना मदतीचा हात देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असून, सध्या शेतकऱ्यांसाठी मोठा कठीण काळ आलेला आहे. शेतकऱ्यांवरील विविध समस्यांचे सावट दूर करण्यासाठी या सरकारकडे कुठलाही ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळे भविष्यकाळात शरद पवार यांच्या माध्यमातून सर्व सामान्य शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याची आपल्या परिसराला एक चांगली संधी आलेली आहे. चाळीस पन्नास वर्षे पक्षासाठी व तळागाळातील सर्व सामान्यांसाठी लढणाऱ्या पांडुरंग अभंग यांच्यासारख्या व्यक्तीचा हा सर्वपक्षीय गौरव सोहळा आहे. 

या वेळी जिल्हाध्यक्ष घुले म्हणाले की, शेवगाव -पाथर्डी शहरासह ५५ गावांतील सुमारे तीन लाख लोकसंख्येला वरदान ठरणारी शेवगाव -पाथर्डी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून, त्याला पुरक नळपाणी पुरवठा योजना करण्यासाठी आघाडी सरकारचे तत्कालीन पुरवठामंत्री लक्ष्मण ठोबळे यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. या कार्यक्रमास मोठया संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

या वेळी खासदार शरद पवार यांच्या होणाऱ्या कार्यक्रमाचे भातकुडगाव, बोधेगाव, लाडजळगाव व दहिगाव ने येथील गट व शेवगाव शहराचे नियोजन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले. जि.प. परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.