श्रमिकनगर येथील मार्कंडेय विद्यालयाची दिंडी उत्साहात .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विठ्ठल विठ्ठल...विठ्ठला हरी ओम विठ्ठला..., ज्ञानबा तुकाराम..., विठ्ठल माझा माझा... मी विठ्ठलाचा... ,माऊली...माऊली..., व विठ्ठल नामाच्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझिम व ढोल पथकासह श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात परिसरातून दिंडी काढली.

प्रतिवर्षा प्रमाणे काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थी वारकर्‍यांच्या वेशभुषेत तर विद्यार्थिनी डोक्यावर तुलस घेऊन सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज, टाळ, मृदूंग व विणा हातात घेऊन बाळ वारकर्‍यांनी विठ्ठल नामाच्या गजराने संपुर्ण परिसर दुमदुमन सोडला. विठ्ठल-रुक्मणी, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभुषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले. 

विद्यार्थ्यांनी लेझिमचे डाव सादर केले. दिंडीमध्ये रोप घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी वृक्षरोपण व संवर्धनाचा संदेश दिला. तर स्त्री जन्माच्या स्वागताचे घोषणा देवून जनजागृती केली. बालाजी मंदिर समोर विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता.
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद क्यादर व अरविंद चन्ना यांच्या हस्ते पालखीच्या पूजनाने दिंडीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या (प्राथ.) मुख्यध्यापिका सौ. विद्या दगडे व (माध्य.) मुख्यध्यापक शशिकांत गोरे आदिंसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. लहान मुलांची दिंडी पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्रमिक नगर, भिस्तबाग चौक, कुष्ठधाम रोड येथून मार्गक्रमण करत शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.