केवळ पैसा, संपत्ती ही महत्वाची नसून संस्कार महत्वाचे - हभप इंदोरीकर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुलांवर आई-वडिलांनी चांगले संस्कार करावे म्हणजे पुढे तो घराचे, शहराचे व देशाचे नाव उज्वल करेल. आणि अशा संस्कारक्षम मुलांमुळे भविष्यात चांगला समाज घडेल. आज संस्कारक्षम पिढी अभावी मुलांमध्ये एकटेपणा, व्यसनाधिनता वाढतांना दिसत आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना येणार्‍या अडचणीतून मार्ग काढला पाहिजे. अनावश्यक हट्ट पुरविणे, केलेल्या चुकांवर पांघरुन घालणे म्हणजे संस्कार नव्हे. कारण पुढे चालून याच गोष्टी सर्वांसाठी घातक ठरु शकतात. केवळ पैसा, संपत्ती ही महत्वाची नसून संस्कार महत्वाचे आहेत, त्यामुळे आजच मुलांवर चांगले संस्कार करा, असे प्रतिपादन प्रबोधनकार हभप इंदोरीकर महाराज यांनी केले. 


माळीवाडा येथील श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे किर्तन झाले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, उत्सव समितीचे छबूनाना जाधव, हभप बाळकृष्ण महाराज खेसे, हभप जालिंदर महाराज निकम, सतीश डागवाले, विनायक आंबेकर आदिंसह भाविक, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना इंदोरीकर महाराज म्हणाले, ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी भारत सुखी होईल. मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू द्या, उगाच एखाद्याची बरोबरी करु नका, त्याची गुणवत्ता तपासा, जी माणसे स्वत:साठी जगतात, ती स्वार्थी असतात. दुसर्‍यासाठी जगतात ती निस्वार्थी असतात. पश्‍चात्य देशाची संस्कृती ही आपल्या देशाला घातक ठरु शकते. त्यामुळे भारतीय संस्कृती ही सर्वात चांगली संस्कृती आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, टाईमपास होत नाही, म्हणून किर्तनाला येवून बसू नका तर त्यातून मिळणार्‍या ज्ञानाचे आपल्या जीवनात आचरण करा. नाही तर किर्तनाला यायचं आणि भलत्याच गप्पा मारायच्या आणि म्हणायचं किर्तन ‘लयी भारी झालं’. जीवन हे सुंदर आहे, ते जगण्याचा प्रयत्न करा, आध्यात्माने मनाला शांती मिळते, सुख मिळते. नाम स्मरणात मोठी ताकद आहे, तेव्हा देवाचे नामस्मरण करा, अशा वेगवेगळ्या प्रबोधात्मक गोष्टींतून हभप इंदोरीकर महाराज भाविकांना अध्यात्मातून प्रबोधन केले. 

यावेळी समितीच्यावतीने हभप इंदोरीकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळू पुंड, भाऊसाहेब पुंड, दशरथ गाडळकर, बाबासाहेब पटवेकर, श्याम चिपाडे, सुरेश इवळे, सुनिल आंबेकर, अनिल पडोळे, शरद चाफेकर, नामदेव खंडागळे, पप्पू म्हस्के, बाळू चेडे, आभिजित ससे, गणेश कोल्हे, बाळासाहेब रासकर, शिवाजी जाधव, दत्ता बनकर, यादवराव खेडकर, चंद्रकांत ताठे, ज्ञानेश्‍वर घटमाळ, सुनिल डबरे, अनिल फुलसौंदर, बाळासाहेब आगरकर, तुकाराम पटवेकर, नंदू ससे, संदिप शेरकर, बाबासाहेब सुडके आदि उपस्थित होते. तुडंब भरलेल्या भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता. लोक मिळेल त्या ठिकाणी जागा धरुन बसले होते. सुमारे दोन तास चाललेल्या या किर्तनात महिला, भाविक अबालवृद्ध रंगून गेले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.