स्वातंत्र्य प्राप्तीपेक्षाही मोठ्या समस्या देशात निर्माण - अण्णा हजारे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वातंत्र्य प्राप्तीपेक्षाही मोठ्या समस्या देशात निर्माण झाल्या आहेत. युवा शक्तीनेच सामाजिक परिवर्तन होणार आहे. युवकांनी समर्थपणे सक्षम समाजनिर्मितीसाठी प्रयत्न केल्यास क्रांती होणार असल्याचा विश्‍वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.

नेहरु युवा केंद्राच्या वतीने आयोजित राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबीरातील युवकांनी राळेगणसिध्दीला भेट दिली असता, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करताना बोलत होते. चांगले काम करताना विरोध होत असतो. मात्र युवकांनी झालेला अपमान संयमाने सहन केल्यास व अहंकार सोडल्यास प्रगती होत असल्याचे हजारे यांनी सांगून, सामाजिक कार्याची युवकांना प्रेरणा दिली.

केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्र येथे पंधरा दिवसीय राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबीर चालू आहे. यामध्ये पुणे, नाशिक, बीड व जालना या चार जिल्ह्यातील नेहरु युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक सहभागी झाले असून, त्यांनी राळेगणसिध्दीस नुकतीच भेट देवून, पाणलोट विकासाची कामे जाणून घेतली व अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला. जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांनी युवक-युवती सक्षमीकरणासाठी नेहरु युवा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली.

चालू असलेल्या प्रशिक्षण शिबीरात युवकांना समाजपरिवर्तन व आपली भुमिका, समाजकारण व राजकारण यामधील युवकांचा सहभाग, युवकांसाठी शासकीय योजना व त्याचा प्रचार प्रसार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास यामधून आधुनिक भारताची निर्मिती, सक्षम प्रशासकीय अधिकारी, राजकीय व सामाजिक नेतृत्वाची निर्मिती या संदर्भात प्रा.डॉ.रमेश वाघमारे, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डिअ‍ॅब्रिओ, बाबाजी गोडसे, जय युवा अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड.महेश शिंदे, पै.नाना डोंगरे, विद्या क्षिरसागर, सोनाली दिलवाले, टाटा सामाजिक विज्ञान संस्था (मुंबई) चे प्रा.निलेश थुल यांनी मार्गदर्शन केले. उल्लेखनीय कार्य करणार्‍या स्वयंसेवकांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था (मुंबई) यांच्याकडून विकास व सामाजिक परिवर्तन प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी लेखापाल हरीष ठाकरे, रमेश गाडगे, अक्षय चौधरी, मनिषा खरात जिल्ह्यातील क्रीडा मंडळे, महिला मंडळ, स्वयंसेवक कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. सोमवार दि.10 जुलै रोजी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक उपेंन्द्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.