उपमहापौर श्रीपाद छिंदम हे विसराळू !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उपमहापौर श्रीपाद छिंदम हे प्रत्येक ठिकाणी राजकारण आणत आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधाला विरोध अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे नगरवासियांना माहित आहे. शासनाच्या निधीतून नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्याच कामाला खीळ घालण्याचा प्रयत्न उपमहापौरांकडून होत असल्याचा आरोप दिलीप सातपुते यांनी केला आहे. 


उपमहापौर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनांवर ज्या नगरसेवकांच्या सह्या आहेत. त्यांच्या प्रभागातील कामे या निधीतून प्रास्तावित करण्यात आली आहेत, असे देखील दिलीप सातपुते यांनी पत्रकात म्हटले आहे.महापौर यांना शासन निधी खर्चाचे अधिकार हे अनाधिकृत आहेत, असा आरोप करणारे उपमहापौर श्रीपाद छिंदम हे विसराळू असल्याची टिका शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

छिंदम यांनी काही दिवसापूर्वी आयुक्तांना पत्र देत महापौर सुरेखा कदम यांना शासन निधी खर्चाचे दिलेले अधिकार हे अनाधिकृत आहेत. या अधिकारासाठी कोणत्याही ठराव झाला नसल्याचा आक्षेप त्यांनी लेखी पत्र देत घेतला होता. उपमहापौर यांच्या या आरोपांचे खंडण करताना दिलीप सातपुते यांनी उपमहापौर काही तरी विसरत आहेत, असे म्हणत चांगले बरेच काही सुनावले आहे.

सातपुते म्हणाले, ''महापौर सुरेखा कदम यांनी अंदाजपत्रकासाठी २७ मार्चला महासभा बोलावली होती. ही सभा दोन दिवस चालली. या सभेला उपमहापौर श्रीपाद छिंदम देखील उपस्थित होते. सभागृह नेते अनिल शिंदे यांनी या सभेत शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून कामे सुचविण्याचा अधिकारी महापौर यांना देण्यात यावेत, असा ठराव मांडला होता. या ठराव मांडत असताना उपमहापौर तेथे उपस्थित होते. त्यावेळी उपमहापौर यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.

शहर विकासासाठी उपमहापौर यांचा निधी ५० लाख रुपयांवरून ७५ लाख रुपये, म्हणजेच २५ लाख रुपयांनी वाढविण्यात आला. याच महासभेत ठरावानुसार उपमहापौरांनी काही सूचना मांडल्या होत्या. हे ते विसरले वाटते? त्याचप्रमाणे उपमहापौर यांनी यावेळी शासनाच्या निधीतून सुमारे दीड कोटी रुपयांची कामे प्रास्तावित केली होती. 

त्यापैकी काही कामे करण्यात आली. काही कामे आयुक्तांकडे मंजुरीसाठी आहेत. त्यांनीच सुचविलेल्या कामांसाठी निधीची दुरूपयोग होत असेल, तर त्यांनी सुचविलेली कामे अनावश्यक आहेत का ? असा देखील प्रतिप्रश्न सातपुते यांनी उपस्थित केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.