‘अमृत’च्या वाढीव रकमेच्या निविदेला स्थायीची मंजुरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी प्राप्त झालेल्या निविदांतून व्यापारी लिफाफ्याद्वारे प्राप्त झालेले दर व वाटाघाटीनंतर दिलेले दर यांना छाननी समितीची मिळालेली शिफारस, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आलेल्या अहवालानंतर शोनन इंजिनिअरिंग वर्क्‍स प्रा.लि.च्या सात टक्‍के जादा दराच्या निविदेला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्रस्तावाला राज्यस्तरीय निविदा समितीची मंजुरी मिळणे आवश्‍यक असल्याने हा प्रस्ताव तत्काळ राज्यस्तरीय निविदा समितीकडे पाठविण्यासही या सभेने मान्यता दिली आहे.

केंद्र शासनाच्या या योजनेला सन 2015-16 मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, सुरुवातीला दोन वेळेस निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मुदतवाढीमध्ये तापी प्रिस्तेस प्रॉडक्‍ट जे.व्ही. या कंपनीची निविदा प्राप्त झाली. मात्र, सदर संस्थेला काळ्या यादीत टाकल्याने फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली. या नंतरही निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही, अशा चक्रात ही योजना जवळ-जवळ दोन वर्षे रखडली.

नगर शहर व उपनगराच्या पाणीपुरवठा योजनांचा या योजनेत समावेश असल्याने पुढील 30 ते 35 वर्षांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सुटणार असल्याने ही योजना नगर शहरासाठी जीवनदायी ठरणार आहे. फेज-2 च्या वाढीव कामांचाही समावेश या योजनेत करण्यात आला आहे. 

या अभियानांतर्गत योजना तयार करणे, योजनेचे सर्वेक्षण करणे, ऍप्रोच चॅनल,सद्यस्थितीतील जॅकवेलची दुरुस्ती, रॉ वॉटर रायझिंग मेन, सद्यस्थितीतील बी.पी.टी.ची दुरुस्ती करणे, रॉ वॉटर ग्रॅव्हिटी मेन, 45 एमएलडीच्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राची स्थापत्य व यांत्रिकी दुरुस्ती करणे, स्काडा व ऍटोमायझेशन शुद्ध पाणी रायझिंग मेन वसंत टेकडी येथे जीएसआर क्षमता, तसेच सद्यस्थितीतील जीएसआरची दुरुस्ती करून क्षमता वाढविणे, ग्रीन सोलर पॉवर प्लॅंटची क्षमता 5 एमडब्ल्यु, आदी कामांचा या योजनेत समावेश आहे.

सदर योजनेतील कामांसाठी काम करण्यास ठेकेदार संस्था तयार नसल्याने विकासकामांना खीळ बसत असल्याचा, तसेच शहर व उपनगरातील पाणीपुरवठा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. शिवाय, उन्हाळ्यात पाणीप्रश्‍नावरून महापालिकेत रोज एक तरी मोर्चा येत होता. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने रात्री-अपरात्री पाणी सुटल्याने भगिनी वर्गाचे होणारे हाल आता या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. शिवाय, वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने आता प्राप्त झालेल्या एकमेव निविदेला मान्यता देण्याचा निर्णय घ्यावा, असे बहुसंख्य सदस्यांचे मत पडल्याने अखेर या निविदेस मान्यता देण्यात आली आहे.

स्थायी समितीने मंजूर केलेल्या या निविदेस आता या प्रकल्पापोटी 7.01 कोटी रुपयांचा जादा निधी द्यावा लागणार आहे. त्याची तरतूद वेळ पडल्यास मनपा निधीतून करावा, असे मत अनेक सदस्यांनी मांडले. याव्यतिरिक्त विषयपत्रिकेवर असलेल्या अन्य विषयांनाही मंजुरी देण्यात आली. तसेच, नव्याने लागू झालेल्या जीएसटी करप्रणालीची शासकीय परिपत्रिकाप्रमाणे कार्यवाही व्हावी, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी, सिनेअभिनेता मधुकर तोरडमल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.