दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड उध्वस्त.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र शासनाने राज्यात एक ते सात जुलै दरम्यान 4 कोटी वृक्षारोपण करण्यासाठीचे आवाहन केले होते. त्यामुळे मागील सप्ताहात सर्वत्र वृक्ष लागवड करण्यासाठी शासकीय यंत्रणा, सहकारी संस्था व संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून गावोगावी वृक्षारोपण केले. मात्र या सप्ताहात जलसंपदा विभागाकडून वृक्ष लागवड करण्याऐवजी दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड उध्वस्त करण्याचे काम करण्यात आले आहे. 


निळवंडे धरणाच्या उच्च स्तरावरून नेण्यात येणार्‍या उजव्या बंदिस्त पाईप लाईनीतील खोदकामात सामाजिक वनीकरण विभागाच्या सुमारे एक हजार वृक्षांची वाट लागली आहे. जलसंधारणच्या नावाखाली जलसंपदा विभागाने आपल्या नियुक्त ठेकेदाराला हाताशी धरून पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने डौलात उभे राहिलेले वृक्ष आडवे करून जमिनदोस्त करण्यात आले आहेत.

उर्ध्व प्रवरा (निळवंडे) प्रकल्पाच्या संगमनेर येथील कालवा विभागाचे अंतर्गत उच्चस्तरीय बंदिस्त उजव्या कालव्यातून तांभोळ (तालुका, अकोले) गावातील पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येत आहे. ही पाईपलाईन अकोले ते देवठाण रस्त्यालगत खेटून खोदाई करून टाकण्याची घाई सुरू आहे . ज्या ठेकेदाराने हे काम सुरू केले आहे त्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने डांबरी रस्त्यालगत सामाजिक वनीकरण विभाग व तांभोळ ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्च करून एक हजार वृक्ष लावण्यात आले होते. 

सुमारे तीन वर्षापासून संवर्धन करून डौलदारपणे डोलत असलेल्या या शेकडोंच्या संख्येने उभ्या असलेल्या जिवंत झाडांची कत्तल पाईपलाईन टाकणार्‍या ठेकेदाराने केली आहे. वास्तविक ही पाईपलाईन रस्त्याला खेटून टाकण्याऐवजी रस्त्यापासून पंधरा फूट दुरून शेतातून नेता येणे शक्य होते. तसे झाले असते तर या शेकडो वृक्षांचे प्राण वाचवता आले असते. कारण ही पाईपलाईन दीड मीटर खोल जमिनीखालून नेण्याचे टेंडरिंग आहे. शिवाय ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतून कोणत्याही प्रकारची लेखी अथवा पुर्व परवानगी नसतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतून नेण्यात आली आहे. 

ही पाईपलाईन करताना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करणे अपेक्षितच नाही. एकीकडे महाराष्ट्र सरकार वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करीत आहे, पण दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून याच काळात शेकडो वृक्षांची कत्तल करून वृक्ष लागवड सप्ताहास हरताळ फासण्यात आला आहे.  
अकोले ते तांभोळ रस्त्यालगत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बिहार पॅटर्न अंतर्गत दोन तीन वर्षात लाखो रुपयांचा खर्च करून वृक्षारोपण करण्यात आले व ही झाडे जोपासन्यात आली होती. यासाठी गावातीलच मजूरवर्ग नियुक्त करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांत त्यांनी डोक्यावरून तर कधी ट्रन्करने पाणी विकत आणून या झाडांना जगण्यासाठी मेहनतीने काम केले होते. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे बिहार पॅटर्न योजनेच्या माध्यमातून खर्च करण्याची पंचवार्षिक योजना आखली असून आतापर्यंत शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपयांचा खर्च झाला आहे.

मात्र जलसंपदाच्या कालवा विभागाने यासर्व योजनेचा विचार न करता बिनदिक्कतपणे शासनाच्या या योजनेवरच नांगर फिरवला आणि मोठ्या मेहनतीने जोपासना केलेल्या वृक्षांची कत्तल करून ते भुईसपाट केले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रविण नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सार्वजनिक बांधकाम विभागचा फोन व नाईक यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने प्रतिक्रिया मिळाली नाही.

सामाजिक वनीकरण विभागात मी वनक्षेत्रपाल असताना अकोले ते देवठाण मार्गालगत तांभोळ शिवारात शासकीय खर्च करून बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड केली आहे. या योजनेला 31 मार्च रोजी आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ही वृक्ष लागवड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली असेल. त्यामुळे या झाडांच्या देखभालीचे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनिस्त राहील. तरीही मी या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना लगेचच आदेश दिले आहेत. वृक्ष तोडीसाठी जे कोणी दोषी आहेत, त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई व वन विभागाची रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अहमदनगर जिल्हा वन विभागाचे सहायक जिल्हा वनसंरक्षक बी. जे . निमसे यांनी सांगितले .

तांभोळ रस्त्यालगत पाईपलाईन करण्यासाठी तोडण्यात आलेल्या शेकडो वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी जलसंपदा विभागाचे जे कोणी जबाबदार आहेत, त्यांना विचारणा केल्यावर वृक्ष तोडीची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकारी व वन विभागाला करण्याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी दिली आहे .

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.