केडगाव हत्याकांडातील आरोपी गुंजाळच्या घरी सापडली तलवार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपींना गावठी कट्टा पुरवणारा बाबासाहेब विठ्ठल केदार (वय ३८, रा.अंबिकानगर, केडगाव. मूळ रा. निमगाव वाघा, ता.नगर) यास विशेष तपास पथकाने बुधवारी (दि.११) ताब्यात घेतले असल्याची माहिती तपास अधिकारी पो.नि. दिलीप पवार यांनी दिली. 

केडगाव येथे महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी संशयित आरोपी संदिप गुंजाळ हा पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने गुन्ह्याची कबुली देत एक पिस्तल व गुप्ती पोलिसांकडे जमा केली.

याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री तीन आमदारांसह ३० ते ३५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संदीप गुंजाळसह आ. संग्राम जगताप, बाळासाहेब एकनाथ कोतकर व भानुदास उर्फ बी.एम. कोतकर यांना ताब्यात घेण्यात आले होते. या चौघांना गुरूवार दि. १२ एप्रिलपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने आणखी १० जणांची चौकशी केली असून यातील आरोपींकडे कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात गावठी कट्टा पुरवणारा बाबासाहेब केदार याचे नाव पुढे आले. केदार यास विशेष तपास पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या हत्याकांडाचा तपास प्रगतीपथावर असल्याचे सांगत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगत पोलिस प्रशासनावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले होते. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

गुंजाळच्या घरी सापडली तलवार.
केडगाव हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळ याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात विना परवाना तलवार आढळून आली असून त्यानूसार पोना. सुनिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र आहालाजी गुंजाळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.