निंबोडी घटनेतील दोषींवर कडक कारवाई - शालिनीताई विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्‍यातील निंबोडी येथे जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग खोलीचे छत कोसळून मृत पावलेल्‍या 3 विद्यार्थ्‍यांच्‍या नातेवाईकांची जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी सांत्‍वनपर भेट घेवून, त्‍यांना दिलासा दिला. ही घटना अतिशय दुर्देवी असून, आम्‍ही संपुर्णपणे तुमच्‍या पाठीशी उभे असल्‍याचे त्‍यांनी या तीनही विद्यार्थ्‍यांच्‍या परिवाराला सांगितले.

घटनेत मृत पावलेले सुनिल भिंगारदिवे, वैष्‍णवी प्रकाश पोटे आणि श्रेयस प्रविण राहाणे या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांची आज त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जावून, सौ.विखे पाटील यांनी भेट घेतली. जिल्‍हा परिषद सदस्‍य संदेश कार्ले, राजेश परजने, शिवाजीराव गाढे, प्रतापराव शेळके यांच्‍यासह स्‍थानिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

शाळेच्‍या इमारतीबात सखोल चौकशी करण्‍याचे आदेश आपण कालच प्रशासनाला दिले असून, या शाळेची खोली स्‍थानिक पातळीवर ग्रामपंचायतीनेच सर्वतोपरी निर्णय करुन बांधली होती. या बांधकामाचीही चौकशी करण्‍यात येणार असल्‍याचे सांगतानाच यामधील दोषींवर कडक कारवाई करण्‍याचा इशारा त्‍यांनी या प्रसंगी दिला. गावातील विद्यार्थ्‍यांसाठी शाळेची तात्‍पुरती सोय करण्‍याबाबत आपण प्रशासनाला आदेश दिले असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

काल सांयकाळी ही घटना घडल्‍यानंतर जिल्‍हा परिषद अध्‍यक्षांनी तातडीने घटनास्‍थळी भेट दिली होती. घटनेमध्‍ये जखमी झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना त्‍यांनी तातडीने उपचार मिळावे म्‍हणून शासकीय रुग्‍णालयासह नगर शहरातील खासगी रुग्‍णालयात सुविधा उपलब्‍ध करुन दिली होती. रात्री उशिरापर्यंत थांबून त्‍यांनी सर्व उपचारांची माहीती घेतली.

मंगळवारीही सौ.विखे पाटील यांनी उपचार करणा-या सर्व डॉक्‍टरांशी व्‍यक्‍तीश: चर्चा करुन विद्यार्थ्‍यांच्‍या तब्‍येतीची विचारपुस केली आहे. मृत विद्यार्थ्‍यांच्‍या कुटूंबियांना शासन मदत मिळावी म्‍हणून, जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून प्रस्‍ताव तयार करण्‍यात येत असून, जखमींच्‍या उपचाराचा खर्चही जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे.

जिल्‍हा परिषदेमध्‍ये अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी सर्व वरिष्‍ठ आधिका-यांची तातडीने बैठक घेवून, जिल्‍ह्यातील शाळांच्‍या इमारतींबाबत असलेल्‍या समस्‍यांचा आढावा घेतला. नादुरुस्‍त असलेल्‍या खोल्‍या आणि इमारतींमध्‍ये शाळा न भरवता विद्यार्थ्‍यांची पर्यायी व्‍यवस्‍था करण्‍याचा सुचना त्‍यांनी प्रशासनाला दिल्‍या आहेत. शाळा खोल्‍यांच्‍या संदर्भात शासनाकडुन निधी मिळावा यासाठी आपण व्‍यक्तिश: पाठपुरावा करीत असून, शिर्डी संस्‍थानकडे शाळा खोल्‍या बांधण्‍यासाठी निधीची मागणी यापुर्वीच केली आहे याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.