शेवगावात बंधाऱ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील वाघोली गावातील वृद्धा नदीच्या पात्रातील बंधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरून पाण्यात पडून बुडल्याने मुरलीधर दामोधर तनपुरे (वय ६५) या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. बंधाऱ्याच्या काठावर जनावरे चारत असताना बंधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना काल शुक्रवारी ( दि.२५) रोजी घडली.

पाटबंधारे खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, असा आरोप नीलेश माधवराव शिरसाठ व ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी ( दि.२०ऑगस्ट ) रोजी बंधाऱ्याजवळ राहणारे निवृत्ती वांढेकर यांच्या घरात पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी नीलेश शिरसाठ यांनी त्वरीत शाखा अभियंता एस.के.हेंबार्डे यांना फोन केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. त्यांनी फोन न घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या मृत्यूची दुर्घटना घडल्याचा आरोप शिरसाठ यांनी केला आहे.

शाखा अभियंता हेंबार्डे यांच्याशी दै. पुण्यनगरीच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता ते म्हणाले की, मागील दोन महिने पावसाअभावी दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीस पाणी वाढावे यासाठी बंधाऱ्याच्या फळ्या टाकल्या होत्या. या गोष्टीस पाटबंधारे खाते जबाबदार नाही. ही बंधाऱ्याच्या फळ्या टाकणाऱ्या शेतकऱ्यांची चूक आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दि.१७ ऑक्टोबर नंतर अशा बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करून बंधाऱ्यात पाणी साठविणे आवश्यक होते. असे असताना आत्ताच बंधाऱ्याचे दरवाजे बंद करून विनाकारण पाणीसाठा केल्याने एका वृद्ध शेतकऱ्याच्या मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे, शेतकऱ्याचे कुटूंब उघड्यावर पडले.

या गंभीर प्रश्नी शासनाने नैसर्गिक आपत्ती समजून, संबंधित कुटूंबास शासन नियमानुसार शेवगावचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी. यांनी तातडीने संबधित घडलेल्या घटनेची आकस्मात मृत्यू बाबत दखल घेऊन, त्या कुटूंबास अर्थिक मदत मिळवून द्यावी. कै. मुरलीधर तनपुरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पाटबंधारे खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.